हुंड्यासाठी छळ; विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या   

पिंपरी : जमीन खरेदी करण्यासाठी माहेरहून दोन कोटी रूपये घेऊन यावे, यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मुळशी माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र तुकाराम हगवणे आणि त्यांच्या कुटुंबाने सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. या छळाला कंटाळून विवाहिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी भुकूम येथे घडली.
 
याप्रकरणी पाच जणांवर बावधन पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णवी शंशाक हगवणे (वय २३, रा. मुक्ताई गार्डन जवळ भुकूम) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे वडील आनंद ऊर्फ अनिल बाळासाहेब कस्पटे (वय ५१, रा. वाकड) यांनी बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पती शंशाक राजेंद्र हगवणे (वय २७), सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे (वय ५७), दिर सुशिल राजेंद्र हगवणे (वय २७), सासू आणि नणंद (सर्व रा. मुक्ताई गार्डन जवळ भुकूम) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
वैष्णवी आणि आरोपी शंशाक यांचा २८ एप्रिल २०२३ रोजी विवाह झाला होता. विवाहामध्ये वैष्णवीच्या वडिलांनी आरोपींना ५१ तोळे सोने, फॉरच्युनर कार, चांदीची भांडी दिले होते. त्यानंतरही आरोपींनी वैष्णवी यांचा लग्नाच्या दुसर्‍या दिवसांपासून शारीरिक आणि मानसिक छळ करण्यास सुरूवात केली. त्यामुळे वैष्णवी यांनी २७ नोव्हेंबर २०२३ मध्ये उंदीर मारण्याचे औषध पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतरही माहेराहून जमीन खरेदीसाठी २ कोटी रूपये आणावे, या मागणीसाठी आरोपींकडून मानसिक आणि शारीरिक छळ सुरू होता. 

Related Articles